जाणीव
चाललेल्या परिस्थितीत गेले दोन महिने प्रचंड बेक्कार मानसिकतेत गेले. घरीदारी प्रचंड काम , येता जाता रस्त्यांवरची उदासीनता, नातेवाईकांची ,मैत्रिणींची भेट नाही , खरंतर भटकंतीची अफाट आवड असलेली मी! अनेकदा कामावर दांड्या मारून सहज वरंध घाट किंवा पन्हाळ्या पर्यंत भटकून येणारे आम्ही पण लेकाची बारावी त्यानंतर आलेला दळभद्री कोरोना, मग लेकाच्या एन्ट्रन्स परीक्षा ,ऍडमिशन मूळे गेल्या तीन वर्षात पुण्याची वेस सुद्धा ओलांडली नाही. परिस्थिती जरा बरी होतीय तोवर ही दुसरी लाट!!आता आपण डिप्रेशन मध्ये जातोय की काय ही अवस्था झाली होती. अशातच सकाळी सकाळी गडबडीच्या वेळेस फोन वाजावा , नंबर अनोळखी! फोन रिसिव्ह करताच पलीकडून आवाज येतो अपर्णा ताई मी योगेश बोलतोय , कशी आहेस तू? आता योगेश कोण? मला प्रश्न पडला ,योगेश नावाचा चुलत भाऊ आहे पण हा त्याचा हा आवाज नाही आणि तो वयाने मोठा असल्याने आज असं ताई कशाला म्हणेल मला ? हो… बरी आहे मी… पण कोण योगेश? मी नाही ओळखलं रे!! ताई तू माझ्यासाठी writer म्हणून आली होतीस ना? ...