जाणीव
चाललेल्या परिस्थितीत गेले दोन महिने प्रचंड बेक्कार मानसिकतेत गेले. घरीदारी प्रचंड काम , येता जाता रस्त्यांवरची उदासीनता, नातेवाईकांची ,मैत्रिणींची भेट नाही , खरंतर भटकंतीची अफाट आवड असलेली मी! अनेकदा कामावर दांड्या मारून सहज वरंध घाट किंवा पन्हाळ्या पर्यंत भटकून येणारे आम्ही पण
लेकाची बारावी त्यानंतर आलेला दळभद्री कोरोना, मग लेकाच्या एन्ट्रन्स परीक्षा ,ऍडमिशन मूळे गेल्या तीन वर्षात पुण्याची वेस सुद्धा ओलांडली नाही. परिस्थिती जरा बरी होतीय तोवर ही दुसरी लाट!!आता आपण डिप्रेशन मध्ये जातोय की काय ही अवस्था झाली होती.
अशातच सकाळी सकाळी गडबडीच्या वेळेस फोन वाजावा , नंबर अनोळखी!
फोन रिसिव्ह करताच पलीकडून आवाज येतो अपर्णा ताई मी योगेश बोलतोय , कशी आहेस तू?
आता योगेश कोण? मला प्रश्न पडला ,योगेश नावाचा चुलत भाऊ आहे पण हा त्याचा हा आवाज नाही आणि तो वयाने मोठा असल्याने आज असं ताई कशाला म्हणेल मला ?
हो… बरी आहे मी… पण कोण योगेश? मी नाही ओळखलं रे!!
ताई तू माझ्यासाठी writer म्हणून आली होतीस ना? आठवलं का?
काही वर्षांपासून फर्ग्युसन कॉलेज च्या साथी एनेबलिंग सेन्टर साठी मी जमेल तसं अगदी थोडं अंध विद्यार्थ्यांसाठी काम करते. त्याच कारणाने योगेशशी माझी साधारण पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याचा पॉलिटिक्सचा पेपर मी लिहायला गेले होते. पेपर संपल्यावर आमच्या थोड्या गप्पा झाल्या ,त्यात राहायला कुठे , काय काम करते अशी माझ्या बद्दलची जुजबी माहिती त्याने मिळवली . त्याला मी म्हंटल होतं Result काय आला ते कळव बरं का! हो ताई नक्की फोन करून सांगेन म्हणत त्याने माझा फोन नंबर घेतला होता . त्याने नंतर त्याचा result ही कळवला होता. पुढच्या तीन चार वर्षात मी या योगेशला पूर्णपणे विसरले होते. आणि आज अचानक या योगेशचा फोन आला ..
हो हो अरे योगेश… तू कसा आहेस? काय चाललंय सध्या? आणि माझा नंबर अजून आहे तुझ्याकडे?
मी छान आहे ताई , सध्या गावाला आहे दोन वर्षांपासून . MA पूर्ण झालं आता MPSC ची तयारी चालुय . जमेल तसं शेतीचं काम करतो मस्त चाललंय सगळं.
आवाजात उत्साह जाणवत होता.
अरे वा वा छानच की!
ताई तू म्हंटली होती ना हॉस्पिटलमध्ये काम करतेस मला आठवलं म्हणून फक्त चौकशीसाठी फोन केला , बरी आहेस ना?घरचे सगळे बरे आहेत ना?काळजी घे ताई!
ज्यांनी ज्यांनी पाचवीपासून माझी मदत केलीय त्यांचे नंबर मी माझ्याकडे ठेवले आहेत.
हो रे एकदम बरी आहे आणि काळजीही घेतेय
योगेश खूप छान वाटलं रे तुझा फोन आला आणि इतकी काळजी आपुलकी तू दाखवलीस!
तू पण काळजी घे स्वतःची आणि MPSC चा RESULT नक्की कळव. आता नाही मी तुला विसरायचे. नंबर सेव्ह करून ठेवते हा. खूप अभ्यास कर आणि काही मदत लागली तर हक्काने सांग.
हो ताई नक्की!! मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. काळजी घे ,चल ठेवतो फोन.
अगदी थोडकाच संवाद पण खूप सकारात्मक, खूप आपुलकी , काळजी आणि जाणीव असलेला!
मनावरची सगळी मरगळ दूर करून गेला. माझ्यात जणू नवा उत्साह भरून गेला.
अपर्णा...(ADP)
Comments
Post a Comment