माझं काम माझा अभिमान
#माझं काम माझा अभिमान
खरंतर मी घरातलं शेंडेफळ त्यामुळं साहजिकच जरा लाडवलेली. फार मोठं करिअर वगैरे करण्याचं माझं स्वप्न नव्हतंच , मी म्हणजे जब वी मेट मधल्या करिनाटाईप होते लग्न संसार याची स्वप्न बघणारी!!(ऐसा घर , वैसी बाल्कनी ,ऐसें परदे)म्हंटल तर आता कोणालाही खोटं वाटेल.
दोघं मोठे भाऊ अत्यंत हुशार त्यामानानं माझी बुद्धी सामान्य म्हणता येईल.भावांच्या तुलनेत अभ्यासातली एकूण गती पाहता बेसिक पदवीपर्यंत तरी शिक्षण पूर्ण करेल की नाही ही शंका सगळ्यांना वाटत होती. दहावीला तसे बरे मार्क पडले आणि बाकी काही झेपणार नाही म्हणून मी आर्टस् कडे वळले पण कला शाखेतील त्यावेळी मी निवडलेले विषय नंतर मला निरस वाटू लागले आणि मी पुढील वर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
बायोलॉजि , केमिस्ट्री, मध्ये आवड निर्माण झाली. पुढे डॉक्टर मामाच्या सल्ल्यानुसार पॅथॉलॉजिचा डिप्लोमा केला.
ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच शिकत असताना पुण्यातील प्रथितयश गोडबोले लॅब मध्ये काम करण्यास सुरुवात केली ,त्या लहान वयात तिथे डॉक्टर रमेश गोडबोले यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, फक्त लॅबच काम नाही तर कुठलंही काम करताना उपयोगी पडणारा प्रामाणिकपणा , शस्त , वक्तशीरपणा ,विसर पडू नये म्हणून कामाच्या नोंदी करून ठेवणं याच गोष्टी पुढे संसारात देखील खूप उपयोगी ठरल्या.
पूढे लग्न संसार जवाबदर्या यामुळे नोकरीत ब्रेक घ्यावा लागला. माझी आई देखील सगळ्या जवाबदर्या अडचणी पार पाडून नोकरी करतच होती त्यामुळे तिचं म्हणणं हेच होत की स्त्रियांनी फक्त आर्थिक अडचण म्हणून नोकरी करू नाही तर नोकरीमुळे तुम्हाला मिळणारा आत्मविश्वास , सोशल atmosphere आणि वैचारिक प्रगल्भता या गोष्टींसाठी घराबाहेर पडावं. निदान पार्ट टाइम का होईना तू नोकरी चालू ठेवावीस असं माझ्या आई वडिलांची इच्छा होती त्यामुळे मी पुन्हा नोकरी चालू केली.
नोकरी करता करता नवीन गोष्टीही शिकत गेले , स्वतःला अपग्रेड करत गेले , क्लिनिकल रिसर्च डिप्लोमा केला. अजूनही पुढे शिकत राहण्याची इच्छा आहे.नवराही याच क्षेत्रात असल्याने त्यालाही त्याच्या कामात मदत करू लागले.
कामावर प्रेम करायला लागले त्यामुळे आता ते खूप एन्जॉयही करते.
आपल्या कामावर आपण प्रेम केल्याने कामाचा ताण कधीच येत नाही हे माझ्या नवऱ्याचं म्हणणं आणि खरोखर आज त्याचा प्रत्यय येतोय.नोकरी सांभाळून घरात अंथरुणात असणाऱ्या सासूबाई ,दोघ भाऊ परदेशात असल्याने मधून अधून आई वडिलांची देखील घ्यावी लागणारी दखल त्याच बरोबर भरपूर वाचन आणि लिखाण या गोष्टी मी सहजतेने करू शकते.
माझं काम म्हणजे फक्त नोकरीच नाही तर घरकाम , माझे छंद हे देखील माझा अभिमान आहेत.
©Aparna…(ADP)
Comments
Post a Comment