आई नावाचं सुख
गरम पोळी तीही तव्यावरून ताटात ,त्याबरोबर कढईतली गरम भाजी , उकळती वाटीभर उसळ , डाव्याबाजूला खमंग फोडणी बसलेली कांदा टोमॅटोची कोशिंबीर आणि सिक्रेट रेसिपी वाली लसूण खोबऱ्याची चटणी!! दोन गरम पोळ्या पोटात गेल्यावर अजून एक , अजून एक असा होणारा आग्रह आणि त्यानंतर पहिल्या वाफेचा भात , त्यावर हिंग जिरेपूड युक्त उकळीच वरण आणि त्यावर दोन चमचे भरभरून तूप !! सुख!!
सुखच की
आणि एकदा का लग्न होऊन सासरी गेलो की हे सुख फक्त माहेरीच मिळू शकतं हे शाश्वत सत्य!!
आईच्या हातचं असं गरम गरम चविष्ठ जेवून मिळणार सुख जगातलं सर्वोच्चच म्हणायला हवं.
सत्तरीच्या पार गेलेली आई आजही लेकीला तव्यावरच्या गरम पोळ्या आग्रह करकरून वाढते तेव्हा आजकाल मला गलबलून तर येतच पण अवघडल्या सारखंही होतं. खरंतर तीचं थकलेलं शरीर पाहून ,आयुष्यभर कष्ट केलेल्या तिला आपणच असं गरम खाऊ पिऊ घालावं असं वाटतं पण आईच ती कुठलं ऐकणारी!
आगं काही दमत बीमत नाही गं मी , लेकीला आई खाऊ पिऊ नाही घालणार तर कोण? मस्त पोटभर जेव आणि नंतर तो लाडू घे गुळपापडीचा , आजच केलाय ताजा ताजा!!
खरंतर जेवणापेक्षा त्या मायेने आणि तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानानेच पोट तुडुंब भरलेलं असतं. पण साजूक तुपात खरपूस भाजलेली तांदुळाची पिठी आणि गूळ फक्त हे तीन जिन्नस वापरून तिने केलेले लाडू पण त्याची अद्वितीय चव आठवून ते चाखण्याचा मोह टाळूच शकत नाही.
ते लाडू आपण परतताना ती डब्यात भरून देते आणि तिच्या मायेच्या गोडव्याने ते अधिकच रुचकर झालेले असतात.
आई!! नावातच सुख लपेटलेलं असतं नाही का?
Comments
Post a Comment